'उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे'

१४ एप्रिल १८९१ शतकानु-शतके अंधारात असणाऱ्या अनेकांचा सूर्योदय झाला, तो हा सुवर्ण दिवस भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाचा जन्मदिवस. हजारो वर्षांपासून नरक यातना भोगणाऱ्या, खचलेल्या-पिचलेल्या, शिक्षण आणि समाज प्रवाहापासून हजारो मैल दूर असणाऱ्या, समाज बांधवांना आत्मविश्वासाने उभा करणारा युग पुरुष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर. शाहीर वामन दादा कर्डक यांनी त्यांच्या शाहीरीत “उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे” हे बाबासाहेबांचे वर्णन तंतोतंत केले आहे.  
       सुजलाम सुफलाम असणाऱ्या भारत या सोने कि चिडियावर, जगातील कित्येक लोक भाळले. भारतावर राज्य करण्याचे अनेकांनी स्वप्न पहिले, हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं आणि सोन्याच्या चीडीयाचे पंख छाटले  गेले नालंदा आणि तक्षशीला सारखी जगतविख्यात विद्यापीठे , उत्तमोत्तम आरोग्य सुविधा आणि ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे संतुः निरामया’ हा भाव घेऊन जगणारी प्रजा यामुळे हा देश सुजलाम सुफलाम होता. काळाच्या ओघात झालेली परकिय आक्रमणे, आणि या आक्रमणातून स्वतःला वाचविण्यासाठी निर्माण झालेली घाणेरडी स्वार्थी प्रवृत्ती, चुकीच्या मार्गाने येणारे धन आणि त्यापाठोपाठ येणारा अहंकार, यामुळे भारतात विषमतेचे बीज पसरणे सुरु झाले शिक्षणाचा समान अधिकार एका विशिष्ट जाती पुरता मर्यादित झाला. साध्वी ऋषीनि लिहिलेल्या श्लोकांचा ग्रंथामध्ये समावेश करणारा हाच देश,देविंना देव्हाऱ्यात बसवून, स्त्रियांचा अपमान भर बाजारात करू लागला. जात पात उच्च नीचता यामुळे समाजात प्रचंड दरी निर्माण झाली या दरीची खोली दिवसेंदिवस वाढतच जात होती. ठराविक समाज प्रबळ-अधिक प्रबळ होत गेला आणि ठराविक समाज मागास अधिक मागास होत गेला जगण्यापेक्षाही, मृत्यू बरे वाटावे अशी वेळ निर्माण झाली होती. जनावरांपेक्षाही वाईट वागणूक सहन करत, नरक यातना भोगत जिवंत राहण्याची वेळ जन-सामन्यांवर आली होती. हि दरी नष्ट करण्यासाठी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी प्रचंड कष्ट केले. त्यांच्या या कष्टामुळेच कित्येक कोटी कुळांचा उद्धार झालं
       महु येथे जन्मलेल्या बाबासाहेबांना घडविण्यात संस्कार युक्त करण्यात त्यांचे वडील रामजी सुभेदार यांचे मोठे योगदान आहे. व्यवहारातील शुध्द विचार आणि शुध्द आचार यामुळे योग्य संस्कार बाबासाहेबांवर  झाले पुढे अनेक भ्रमित आणि भ्रष्ट करणाऱ्या समस्यांवरही बाबासाहेबांनी याच संस्कारामुळे सहज मात केली होती. विचारांची स्पष्टता, तत्वाशी तडजोड न करणे आणि समाजहित हेच जीवनाचे उद्दिष्ट हे रामजींनी लहान पणीच बाबासाहेबांमध्ये रुजविले. कबीर पंथाचा प्रभाव रामाजींवर असल्यामुळे भजन प्रार्थनेतून मनःशांतीचे संस्कार लहानपणीच बाबासाहेबांवर झाले. यावेळी उत्तम तबला ही बाबासाहेब वाजवत असत.
नौकरी निमित्ताने रामजींना साताऱ्यात यावे लागले. साताऱ्यातील कॅम्प शाळेत बाबासाहेबांना प्रवेश मिळाला. आणि या शाळेतूनच त्यांना आपण अस्पृश्य असल्याची जाणीव होऊ लागली. वर्गात बसण्यासाठी स्वतंत्र गोणपाट आणावे लागे, पिण्याच्या पाण्यासाठी वेगळी व्यवस्था, पाणी मिळेपर्यंत तहानलेले रहावे लागे. एकदा शिक्षकांनी बाबासाहेबांना फळ्यावर गणित सोडविण्यास सांगितले होते ते फळ्याकडे जाताच सर्व विद्यार्थी त्यांचा विरोध करू लागले. फळ्याकडे धावत जाऊन फळ्यामागील जेवणाचे डबे काढून घेऊ लागले. शाळेतील अशा अनुभवासोबतच समाजातही अस्पृश्यतेची वागणूक मिळत असे. केस कापण्यासाठी न्हाव्या कडे गेले असता, जातीने महार असल्यामुळे त्याने केस कापण्यास नकार दिला. अस्पृश असल्यामुळे मिळणाऱ्या वाईट अनुभवांसोबत त्यांनी त्यांचे शिक्षण जिद्दीने चालू ठेवले
एका अनुभवाने मात्र बाबासाहेनाचे मन हादरून गेले होते. वडील रामजी सरकारी रेशनिंगच्या कामा निमित्त कोरे गावाला राहत असत. शालेय सुट्ट्या सुरु झाल्यानंतर वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या पत्रावरून निघण्यास तयार झाले, सातारा ते मसूर रेल्वे प्रवास आणि पुढे वडिलांनी पाठविलेल्या नौकरासोबत कोरेगावला जाण्याचा विचार सर्व भावंडांनी केला. बाबासाहेबांनी वडिलांना लिहिलेले पत्र वेळेत न पोहोचल्यामुळे भावंडांना घेण्यास कोणी आले नाही. खूप वेळ स्टेशन वर थांबलेले पाहून स्टेशन मास्तरांनी चौकशी केली. जातीने महार असल्याचे कळताच दोन पाउल मागे सरकले. मुलांच्या स्वच्छता आणि टापटीपतेमुळे स्टेशन मास्तर आश्चर्य चकित झाले होते. लहान मुलांची दया आल्यामुळे त्यांना बैलगाडी मिळवून देण्यासही मदत केली. दुप्पट रक्कम आणि बैलगाडी बाबासाहेबांनी हाकावी या अटीवर एक बैल गाडी मिळाली, या प्रवासात नाल्याचे पाणी पिण्याची वेळ बाबासाहेबांवर आली. या अनुभवामुळे बाबासाहेब अधिक खिन्न झाले हि घटना रामजींना काळातच त्यांनाही वाईट वाटले.
वयाच्या नवव्या वर्षी बाबासाहेबांचा विवाह दापोलीच्या रमाबाई यांच्याशी झाला गरिबी आणि हालाकीच्या परिस्थितीमुळे मुंबईतील एका मच्छी मार्केटमध्ये रात्रीच्या वेळी मार्केट मोकळे असताना विवाह संपन्न झाला. हा गरिबीचा संसार रमाबाईनी अत्यंत नेटाने चालविला. शिक्षण घेण्याच्या प्रचंड इच्छेमुळे गरिबीवर मात करणे बाबासाहेबांना जमले नाही.
मुंबई विद्यापीठातून बी.ए ची पदवी संपादन करणारे बाबासाहेब हे पहिले अस्पृश्य विद्यार्थी. बडोदा येथील महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या सहकार्याने, पुढील शिक्षण समाज हित लक्षात घेऊन राज्य शास्त्र आणि अर्थ शास्त्र या विषयांत अमेरिकेत पूर्ण केले. कोलंबिया विद्यापीठ ग्रंथालयातील बाबासाहेबांच्या वाचनाची कीर्ती पंजाब केसरी लाला लजपत राय यांच्यापर्यंत पोहोचली आणि बाबासाहेबांना भेटण्यास लाला लजपत राय प्रत्यक्षरित्या हजर राहिले.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चित्रकलेत विशेष रुची होती. चित्रे पाहायला त्यांना आवडत आणि आपल्यालाही सुंदर सुंदर चित्रे निर्माण करता यावीत, असे त्यांना मनापासून वाटे. बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके विकत घेतली होती. चित्रे काढण्यात आणि रंगविण्यात ते तल्लीन होऊन जात असत. "पेंटिंग ॲज अ पास्ट टाइम' या चर्चिलच्या पुस्तकाने त्यांना आवड निर्माण केली होती.बाबासाहेब व्हायोलिन ही वाजवत असत.
उच्च शिक्षित चांगले कपडे घातले तरी अस्पृश्याला मिळणाऱ्या वागणुकीत कोणतेच बदल होत नाहीत हे ध्यानात घेऊन बाबासाहेबांनी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन, त्यांनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली
इ.स. १९२६ साली आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी  सत्याग्रह केला.या आंदोलनात चित्रे यांचा पुढाकार होता हे स्वतः ब्राम्हण , बाबासाहेबांचा कुठल्याही जातीला धर्माला विरोध नव्हता ते सामाजिक समरसतेसाठी कार्य करत होते. या आंदोलनकर्त्यांवर प्रचंड लाठीहल्ला झाला बाबासाहेंच्या आग्रहामुळे उलट प्रतिक्रिया दिली गेली नाही. या आंदोलना नंतर झालेल्या दंगली पेक्षा तलाव शुद्धीकरण विधीमुळे बाबासाहेब व्यथित झाले. बाबासाहेबांनी केलेले प्रत्येक आंदोलन हे कायद्याच्या चौकटीत बसणारे होते आणि तेच भारताचे पहिले कायदे मंत्री झाले
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अंगात नवचैतन्य संचारले. २ मार्च १९३० ही सत्याग्रहाची तारीख,देवाकडे कोणत्याही मागणीसाठी मंदिर प्रवेशाचा आग्रह नव्हता तर, प्रभू राम हे प्रत्येक भारतीयाच्या मनात वास करतात मंदिरात प्रवेश म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रवेश या भावनेने हे आंदोलन चालविले गेले.
इ.स. १९२० च्या दशकाच्या अखेरीस आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. ब्रिटिश सरकारावरही ते नाराज होते व त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला,मागासवर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ असावा या मागणीला महात्मा गांधींनी विरोध केला त्यासाठी सत्याग्रहही केला आणि पुढे पुणे करार अस्तित्वात आला, गांधींच्या हट्टापायी नको असलेल्या अनेक तडजोडी कराव्या लागल्या .
शिक्षणाशिवाय समाज परिवर्तन होणे शक्य नाही हे बाबासाहेबांनी जाणले आणि ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ हा नारा दिला शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी यासाठी मे १९५३ साली मुंबईत सिद्धार्थ आणि पुढे संभाजीनगर येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली या महाविद्यालयात सर्वांना प्रवेश आहे.
बाबासाहेब दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत राहिले. धर्माशिवाय मनुष्य जगू शकत नाही मानव आशेवर जगतो. धर्मातून आशा आणि आत्मविश्वास  प्राप्त होतो. सवर्णाच्या मनात कधी तरी अस्पृश्यांबद्दल सद्भावना जागृत होईल या आशेवर ते सतत प्रयत्नशील होते. हिंदू धर्मात आपल्याला आदराची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यानी मोठा लढा दिला. पण पाषाणहृदयी हिंदूना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटत नव्हते. त्याना दलित व अस्पृश्य जनता ही नेहमी कुत्र्यामांजरापेक्षाही खालच्या दर्जाची वाटे.शेवटी या अमानवी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे धर्मांतराचा.आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते.
 अस्पृश्यांची संख्या इतकी प्रचंड होती की जर तो मुस्लिम वा ख्रिश्चन धर्मात गेल्यास त्यांच्या संख्याबळात होणारी वाढ हिंदूना नेस्तनाबूत करुन सर्व आघाड्यांवर आपले वर्चस्व गाजवेल,  बाबासाहेबानी मुस्लिम धर्म निवडल्यास या देशाचे नाव एक रात्रीत बदलून इस्लामिस्तान होईल, एवढे साधे समजण्याची अक्कल या हिंदू धर्मांध कट्टरपंथीयांत नव्हती. पण याची जाण असलेले हिंदू मोठे अस्वस्थ झाले. कुठल्याही परिस्थितीत बाबासाहेबाना या धर्मांतरापासून रोखणे गरजेचे आहे याची जाण असलेला हिंदूवर्ग बाबासाहेबाना अक्षरश: विनवण्या करू लागला.अनेक धर्मगुरूंच्या प्रस्तावांचा राजगृहावर वर्षाव सुरु झाला.ख्रिश्चनांचे धर्मगुरू बिशप ब्रेन्टन थॉबर्न ब्रॅडले व मुंबईच्या मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्चचे बिशप या दोघांनी बाबासाहेबाना ख्रिश्चन धर्म स्वीकारून आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करून घ्यावा अशी विनंती केली. मुस्लिम धर्मात येण्याचे आवाहन- बाबासाहेबानी मनोधैर्य एकवटून निजामाच्या प्रलोभनांना नकार दिला व इस्लामचा मार्ग नाकारला.
 बौद्ध धम्माच्या बनारस येथील महाबोधी संस्थेच्या कार्यवाहांनी बाबासाहेबांना तार केली. "भारतात जन्मलेल्या, जातिभेद न मानणाऱ्या, सर्वाना समान समजणाऱ्या आमच्या बौद्ध धम्मात आपण व आपले अनुयायी आल्यास तुम्हां सर्वांचा मोठा उत्कर्ष होईल. मानवी मूल्ये जोपासणारा आमचा बौद्ध धम्म उभ्या जगात पसरला आहे. भूतलावरील प्रत्येक कानाकोपऱ्यात आमच्या बौद्ध धम्माची मोठी ख्याती, अनुयायी व धम्मबांधव आहेत. आशिया खंडातील बहुसंख्य देशांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. ईश्वराला महत्त्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व बंधूत्व शिकविणारा आमचा बौद्ध धम्म तुमचा तेजोमय भविष्य घडवून आणेल. तळागाळातल्या लोकांच्या प्रती अत्यंत करुणा बाळगणारा बौद्ध धम्म तुम्हां सर्वांचा इतिहास रचेल" अशा प्रकारचा एकंदरीत संदेश बाबासाहेबांना मिळाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती ती अशी की, हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभूतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसांत भेद करतो,ज्या धर्मात स्वातंत्र्य, समता, बंधुता नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे, बाबासाहेबांनी धर्मांतरांच्या घोषणेनंतर सलग एकवीस वर्षे विविध धर्मांचा सखोल अभ्यास केला. या काळात त्यांचा कल बौद्ध धम्माकडे वळला. धर्मांतरापूर्वी म्हणूनच मुंबईत १९४५ मध्ये स्थापन केलेल्या महाविद्यालयास त्यांनी सिद्धार्थ, तर औरंगाबादेत १९५० मध्ये काढलेल्या महाविद्यालयास मिलिंद आणि परिसरास नागसेनवन अशी नावे दिली. मुंबईतील दादर येथील आपल्या निवासस्थानालाही त्यांनी ‘राजगृह’ असे नाव दिले. बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण,सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला, धम्मदीक्षा घेतली.
 
भारताला स्वतंत्र देण्याचे इंग्रजांनी मान्य केले आणि १९४६ पासून नवीन प्रांतिक सरकारच्या कामकाजाला सुरुवात झाली. भारताची एक स्वतंत्र राज्य घटना असावी असा विचार होऊन घटना लिखाणाचे काम बाबासाहेबांकडे आले त्यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पहिले . भारतातील प्रत्येकाला सन्मान, शांती, समता मिळवून देण्याचे कार्य या राज्य घटनेने केले आहे. भारताचा ध्व्वज भगवा असावा राष्ट्रभाषा संस्कृत असावी या मताचे बाबासाहेब होते परंतु हे प्रस्ताव योग्य त्या प्रभाव गटांच्या कमतरतेमुळे बारगळले .
रंजल्या गांजल्यांना प्रगतीचा मार्ग दाखवून हा विश्व मानव ६ डिसेंबर १९५६ साली निवर्तले...डॉ.आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी, ही शोककथा वाचून आता पश्चात्तापाने अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा-जसा अधिक प्रकाश पडेल तसे-तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्‌धारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल.
 
share: 

News

Nov 18 2017
Dr. S. Subbiah  (Chennai) and  Ashish Chauhan (Mumbai)  elected unanimously as...
Nov 17 2017
‘‘Child Care activist from Bengaluru”  Shri Gopinath selected for Prof....
Sep 13 2017
We thank the student community of Delhi University for reposing their faith in...
Aug 31 2017
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) JNU Candidates declared for #JNUSU...